वस्त्रे

भारतीय पोषाखाचा विचार केल्यास ही पद्धती पारंपारिक असून त्यामध्ये बदल करण्यास फारसा वाव नाही. कारण ही वस्त्रे म्हणजे कमी अधिक लांबी रुंदीच्या मागावर तयार होणाऱ्या पट्ट्याच होत. यामध्ये शिवणकामास फारसे महत्त्व नाही. महाराष्ट्रही या पद्धतीस अपवाद नाही. तथापि भारतीयांचा जेव्हा परकीयांशी संबंध आला तेव्हा त्यांनी परकीयांचे कांही उपयुक्त वस्त्र प्रकार येथे रुढ करण्याचा प्रयत्न केला. आणि सम्राट अलेक्झांडरच्या आक्रमणापासून ब्रिटिश आक्रमणापर्यंत ही प्रक्रिया सातत्याने चालू असल्याचे दिसत. महाराष्ट्रात याचा आरंभ क्षत्रपांच्या आक्रमणापासून होतो. सातवाहन जेव्हा क्षत्रपांच्या संपर्कात आले तेव्हा सातवाहनानी त्यांचे कांही वस्त्रप्रकार आत्मसात केले. म्हणूनच आपणास नंतरच्या शिल्पकृतीमध्ये हा फरक जाणवतो. यामध्ये आपणास विजार, तंगविजार, शिरबंध, बंडी, झगा ( पायघोळ व अर्धा), पट्ट्यापट्ट्याची व फुलाफुलांची वस्त्रे आदि आढळतात.

सातवाहनोत्तर कालखंडातील वस्त्र प्रकारात थोड्याफार प्रमाणात बदल झाल्याचे बाणभट्ट, ह्युएनत्संग यांच्या लिखाणावरून व अजिंठा आणि बाग येथील चित्रलेण्यावरून जाणवते. आता स्त्रियांच्या अंगावर काठापदराच्या साड्या व अत्याधुनिक प्रकारची वस्त्रे आढळतात. सैनिकांनाही आता गणवेशामध्ये दाखविण्यात आले आहे. नंतरच्या शतकातही असाच पोषाख असावा असे मार्को-पोलो, इब्न-बतूता आदींच्या लिखाणावरुन वाटते.

मध्ययुगीन इस्लामी आक्रमणानी भारतीयांच्या वेशभूषेत कमालीचा बदल घडवून आणल्याचे स्पष्ट होते; कारण पोषाख विषयक त्यांच्या कल्पना भिन्न होत्या. तसेच त्यांच्या सौंदर्य-विषयक संकल्पानाही पूर्णपणे वेगळ्या होत्या. त्यांना अतिशय तलम, जरतारी व शिवलेल्या वस्त्रांची विशेष आवड हाती.. शिवाय ते राज्यकर्ते असल्याने त्यांचा कल नटण्या-मुरडण्याकडे अधिक होता. समाजात त्यांच्या आवडी-निवडी त्वरित रुजल्या गेल्या. त्यांच्याच रंगसंगतीला प्राधान्य मिळाले. ते प्रामुख्याने मध्याआशियातून स्थलांतरित झाले असल्याने त्यांनी आपल्या समवेत आपल्या देशाच्या पद्धतीही आणल्या होत्या. दक्षिणेतील इस्लामच्या आगमनाने कपड्यांच्या शिलाई व भरतकामास वेगळीच गती प्राप्त झाली. या प्रकारच्या वस्त्रामध्ये जामा, कोट, जॅकेट, स्कर्ट, पेटीकोट आदींचा समावेश होता.

याच कालखंडात हिंदू-मुस्लिम संस्कृतीमध्ये सुसंवाद निर्माण होऊन कांही नवे वस्त्र प्रकार रूढ झाले. तसेच या परिसरातील नागरीकरण प्रक्रियेस गती प्राप्त होऊन अनेक नवे केन्द्रे उदयास आली. यामध्ये गुलशनाबाद (नाशिक), दौलताबाद (देवगिरी),औरंगाबाद (खडकी), मोमीनाबाद (अंबाजोगाई), येवला, जालनापूर, शहागड, बाळापूर, पुणे, वाई, सातारा आदि प्रमुख होत.

मोगल सत्तेनंतर या परिसरात मराठ्यांचे राज्य निर्माण झाले (इ.स. १६३० ते १८२०) मराठ्यांना पारंपारिक हिंदू पोषाखाची विशेष आवड होती. तथापि त्यांनाही प्रस्थापित लोकप्रिय इस्लामी वस्त्र प्रकारांचा स्वीकार करावा लागला. या पार्श्वभूमीवर आपण या कालखंडातील वस्त्रप्रकारांचा मागोवा घेऊ या.