वस्त्रे

उपरोक्ल्त केन्द्राशिवाय कल्याण, रत्नागिरी,मालेगाव, जालना, सातारा,अ दामोळ, चांदवड, राजापूर ,वाई इत्यादि बाजार पेठातूनही सुती व रेशमी वस्त्रे तयार होत होती. या कालातील कांही महत्त्वाच्या व लोकप्रिय वस्त्रांचा आपण विचार करू या.

पैठणी :- पैठणी साडी हा मध्यमयुगीन महाराष्ट्रातील लोकप्रिय साडी प्रकार होय. गर्भरेशमी वस्त्रावर सोन्या-चांदीच्या जरीची मीनाकारी केलेल्या काठा-पदराच्या साडी प्रकारास पैठणी म्हटले जाते. रेशमा प्रमाणेच सुतावरही जरतारी काम करण्याचा प्रघात होता. तथापि रेशमाचा मलायमपणा अशा प्रकारच्या सुती साडिमध्ये येत नव्हता. तसेच सुत आणि जर यांच्यामध्ये रेशमाइतका सुसंवाद निर्माण होत नव्हता.

पैठणीची वीण अत्यंत साधी असून हात किंवा पाय चाळ्यातील नक्षीकाम हे पैठणीचे खास वैशिष्ट्य होय. हे नक्षीकाम झाला किंवा जेकार्ड सारख्या आधुनिक यंत्रप्रकारांची मदत न घेता केले जाते हे विशेष होय. केवळ ताणा-बाणा धांग्याच्या सहाय्याने नक्षीकाम करण्याचे तैत्र विकसित करण्यात आले होते. ताणा म्हणजे आडवे धागे [weft].पैठणी वरीलनक्षीकाम उभ्या धाग्याच्या अनेकरंगी लडी वापरून [Extra weft technique] करण्यात येते. नक्षी सामान्यतः पदर व काठावर काढली जाते. नक्षीवरून रांगावरून व जरतारी कामासाठी वापरलेल्या सोन्याच्या वजनावरून पैठणीला निरनिराळी नांवे मिळाल्याने स्पष्ट होते.

उत्तर पेशवाईमध्ये पैठणीस कमालीची लोकप्रियता लाभली होती. मराठा काळातील पैठणीवर ‘असावली’ च्या फुलांचे सुंद्र नक्षीकाम केलेले आढळते. म्हणून त्य साडिला असावली साडी नांवही प्रापत झाले होते. महाराष्टातील हे सर्वात किमती वस्त्र असून त्याची किंमत वापरण्यात आलेल्या सोन्याच्या वजनावरून ठरत असे.

भरजरी नक्षीचा पदर व उठावदार काठ ही पैठणीची खास वैशिष्टये मानावी लागतील. या पदरावर सामान्यतः असावली, अक्रोटी, गझवेल, बांगडीमोर, शिकार-खाना, अजिंठा-कमळ, ह्‌भा परिदा अशा प्रकारची नक्षी काढली जात असे. कांही पैठण्यावर जरतारी बुट्टी विणल्याचे आढळते. अशा साडीला बुट्टीदार पैठणी किंवा शालू म्हणत असत. गडद रंगाच्या पैठणीला शालू म्हटले जात असे. गडद हिरव्या रंगाचा व भरजारी काठा पदराचा शालू या काळात अतिशय लोकप्रिय असल्याचे आढळते. अशा प्रकारच्या शालूची लोकप्रियता स्त्रीजगतामध्ये शिंगेस पोहोचल्याचे दिसते. स्त्रियांचे या शालू विषयीचे आकर्षण हा काव्यसृष्टीतील महत्त्वाचा विषय होता. हिरव्या शालूचे धार्मिक सभारंभात अतिशय महत्त्व होते.

पेशवे दप्तरातील अनेक पत्रांवरून पेशव्याना पैठणच्या पैठणीचे व अन्य वस्त्रांचे खास आकर्षण असल्याचे स्पष्ट होते. ७-१२-१७६८ च्या एका पत्राद्वारे श्रीमंत माधवराव पेशवे यांनी असावली दुप्पट्टे, तसेच तांबड्या, हिरव्या, केशरी व डाळिबी रंगाची वस्त्रे मागविल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे ४-१२-१७६६ पत्राद्वआरे माधवरावांनी आपणास धोतराच्या काठावर ज्या प्रकारची नक्षी हवी आहे ती नक्षी स्वहस्ते काढून पाठविली आहे.

नंतरच्या काळात हैद्राबादच्या निजामानेही पैठणी साडीच्या खरेदीसाठि अनेक वेळा भेटी दिल्या होत्या. निलोफर या निजामाच्या सुनबाईने पैठणला भेट देऊन पैठणीमध्ये कांही सुधारणा सुचविल्या होत्या.