वस्त्रे

कालीघात पैठणी ही लग्नसभारंभात आवश्यक बाब बनली. राजापासून ते सर्वसामान्यापर्यंत सारे जण लग्न सभारंभात पैठणीसाठी हट्ट धरत असत. त्यामुळे पैठणीची मागणी वाढली. या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्याच्या हेतूने अनेक केन्द्रावर पैठणी विणली जाऊ लागली. अशा केन्द्रापैकी येवले हे केन्द्र बरेच नांवारूपास आले. कोयरी पदर हे येवल्याच्या पैठणीचे वैशिष्टय होय. येवल्याशिवाय, पुणे, नाशिक, मालेगाव येथील पैठण्याही प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्र संस्कृतीचे भिन्न धागे एकत्र करण्यात पैठणीचा सहभाग मोठा आहे.

जामदानी : भारतीय कलाकारांची अत्यंत वैशिष्टयपूर्ण कलाकृती म्हणजे जामदानी होय. तसेच पाहता जामदानीची वीण अत्यंत साधी व सोपी असते. तथापि ताण्यावर (warp) नक्षी जोडण्याचे काम अत्यंत कौशल्याचे व दीर्घ मुदतीचे असते. यासाठी निष्ठा आणि चिकाटी या दोन गुणांची आवश्यकता असते. औरंगजेबास जामदानीचे खास आकर्षण होते म्हणून या वस्त्र प्रकारास नंतर औरंगजेबी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. केवळ शासनमान्य कलाकारच जामदानीचे विणकाम करू शकत असत.

हिमरू : हा मुस्लिम जगातातील लोकप्रिय वस्त्र प्रकार होय. ही भरजरी किमखाब या वस्त्राची प्रतिकृती होय. याचे मूळ नांव हमरू असून. हमरू म्हणजे प्रतिकृती. दक्षिणेमध्ये महंमद तुघलकाने सर्वप्रथम हे वस्त्र प्रचारात आणले. यामध्ये रेशीम व सूत यांचे मिश्रण परस्परात मिसळलेले असते. यापासून सर्व प्रकारची वस्त्रे बनविली जात होती. या प्रकारात रेशमाचे प्रमाण अधिक असल्याने ते मुलायम व किमती होते. म्हणून ते सर्वसामान्याना परवडणारे नव्हते. दौलताबाद, औरंगाबाद, पैठण, जालना येथे पूर्वी याची निर्मिती होत होती. आता हिमरू केवळ औरंगाबाद येथेच तयार होते.

मशरू : ही हिमरूची सर्वमान्य प्रतिकृती होय. यामध्ये सुताचे प्रमाण अधिक असल्याने ते सर्वाना परवडणारे होते. शुद्ध रेशमी वस्त्र परिधान करून प्रार्थना करण्यास प्रेषितांनी प्रतिबंध घातल्याने मशरू या वस्त्राची निर्मिती करण्यात आली. केवळ प्रार्थनेसाठी म्हणून हे वस्त्र मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.
किमखाब : सोन्याच्या जरीची भरपूर मीनाकारी असलेले दक्षिणेतील एके काळचे लोकप्रिय सोनेरी वस्त्र होय. हे अतिशय किंमती राजेशाही वस्त्र असून त्याच्या निर्मितीस कठोर परिश्रम व बराच कालवधी लागत असे. एका पर्शियन राजदूतास हे वस्त्र प्राप्त करण्यासाठी पाच वर्षे थांबावे लागले होते. कारण या वस्त्राचे वीणकाम पैठणच्या हातमागावर चालू होते.

फेटा : डोक्याला गुंडाळण्याचे पुरुषांचे वस्त्र म्हणजे फेटा. फेट्याचे विविध प्रकार असून त्याला पगडी असेही म्हटले जात होते. बुट्टीदार पगडी हा पगडीचा लोकप्रिय प्रकार असून हिंदू आणि मुस्लिम याचा वापर करीत असत. जोरदार पगडी. खिडकीदार पगडी, नस्तालिक हे पगडीचे कांही लोकप्रिय प्रकार होत.
मंदिल : हा मलमली कापडाचा फेटा असून त्यामध्ये सोनेरी जर वापरला जात असे.

शंमला : हा फेट्याचा एक वेगळा प्रकार होय. बत्ती, सरबत्ती, सरबंद हे शिरोवस्त्राचेच भिन्न प्रकार होत. सर म्हणजे शिर व बंद म्हणजे बांधणे किंवा गुंडाळणे. तिवटे किंवा तिवट हा व्यापारी वर्गातील लोकप्रिय पगडी प्रकार होय.

रूमाल : हाही फेट्याचाच एक चौरस प्रकार होय. डोक्याला गुंडाळण्यासाठी याचा वापर केला जात होता.

दुपट्टा : खांद्यावर घेण्याच्या पट्टीस दुपट्टा असे म्हणतात. याच्या काठावर जरीकाम केलेले असते.

शेला : अंगावर घेण्याची एक किमती वस्त्र.

मेहमुदी : एक प्रकारचे सुती सफाईदार वस्त्र.

साडी : स्त्रियांच्या पोषाखातील प्रमुख घटक.

चंद्रकळा : एकरंगी रेशमी किंवा सुती साडी. काळी चंद्रकाळ सर्वात प्रसिद्ध होती.

खण : चोळीसाठी तयार केलेला खास वस्त्र प्रकार.

पीतांबर : पुरुषासाठी धार्मिक सोहळ्याच्या प्रसंगी परिधान करायचे रेशमी व जरतारी काठाचे महावस्त्र. याचे काट तुलनात्मक दृष्ट्या छोटे असून याला पदर नसतो. यालाच सोवळे, मुकटा म्हटले जात असे. येवले पीतांबरासाठी प्रसिद्ध होते.

कुर्ता किंवा कुडता : सैल झग्यासारख्या वस्त्र प्रकार. खमीज मुस्लिम वस्त्र प्रकार.

अंगरखा: जाम्याखाली वापरण्याचा वस्त्र प्रकार. मिना किंवा अंगी हे कुडत्यायेच भिन्न प्रकार होत.

मिरजी : डगला, कुफचा, कुबा हे अंगरख्याचे आणखी प्रकार होत.

जामा : मुस्लिम वस्त्र प्रकार.

पेशदार : रंगीत मलमलीपासून तयार करण्यात आलेले मुस्लिम परिवस्त्र.

लहंगा, कंचुकी: ही स्त्रियांची अर्न्तवस्त्रे होत.

या परिसरातील वस्त्रोद्योगास मुस्लिमानी पाठिंबा दिला. याशिवाय त्यांनी कांही लोकप्रिय वस्त्रप्रकारही रूद केले. महमुदी, जाफरखानी, औरंगजेबी, नाफरमानी इ. मुस्लिम बनली असल्याचे पेशवे दप्तरावरून स्पष्ट होते.

रंगकाम : भारतीयांना झळाळणाऱ्या रंगांचे खास आकर्षण आहे. त्यांची रंगांची आवड ही सामान्यतः परिसरावर अवलंबून आहे. कपड्यासाठी वनस्पतिज रंग वापरले जात होते. उदा. गोदावरी काठ आढळणाऱ्या लाखेपासून तांबडा रंग तयार केला जात असे. बाभळीच्या साली पासूनही रंग तयार होत होते. काळा, हिरवा, निळा हे रंग वरील रंगांत नीळ मिसळून करीत असत. सर्वसामान्यपणे पिवळा, जांभळा, नारिंगी, हिरवा, गुलाबी, विटकरी, काळा आणि तपकिरी हे रंग अधिक प्रमाणात वापरात होते.

भरतकाम : वस्त्रांना खुलविण्यासाठी, सुशोभित करण्यासाठी वस्त्रांवर भरतकाम केले जात असे. भरतकाम सुती व रेशमी अशा दोन्ही प्रकारच्या वस्त्रांवर केले जाई. अगदि प्राचीनकालापासून भरतकाम करण्याची कला भारतीयांनी आत्मसात्‌ केली होती. प्राचीन साहित्यामधून भरतकामाचे अनेक संदर्भ मिळतात. पैठणी आणि जामदानी वस्त्रें त्यांच्या जरातारी मीनाकारीसाठी प्रसिद्ध होती. युरोपीय देशामध्ये अशा प्रकारच्या वस्त्रांना फार मोठ्या प्रमाणात मागणी होती. तथापि १७०७ मध्ये ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदा करून भारतीय कापडाची आयात पूर्णतया बंद केली. त्यामुळे भारताच व्यापार बसला. आणि व्यापार बसल्याने भारताची सुबत्ता नष्ट झाली.

आता ही प्रारंपारिक कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता विज्ञानाने व तंत्रज्ञानाने वीणकाम, रंगकाम, भरतकाम, जरीकाम आदि अद्ययावत केले आहे. तथापि मानवाच्या अविरत श्रमातून साकार झालेल्या कलेची बरोबरी यंत्र करू शकणार नाही.