विघ्नहर्ता श्रीगनानन-ओझर

फार पूर्वी हेमवती नगरीत महत्त्वकांक्षी व सत्तालोभी असा ‘अभिनंदन’ नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने इंद्रपदाची प्राप्ती करून घेण्यासाठी यज्ञ सुरू केला. यज्ञात त्याने इंद्र सोडून सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली. ही गोष्ट जेव्हा नारदाकडून इंद्रास समजली. तेव्हा इंद्र अतिशय संतापला त्याने काळाला विघ्नासुर करुन अभिनंद राजाच्या यज्ञात विघ्न आणण्यास पाठवून दिले. विघ्नासूराने अभिनंदनाच्य राज्यात खूप धुमाकूळ घातला. सगळीकडे त्यने विघ्ने आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्व देव भयभीत झाले. त्यांनी गणेशयाग करून गणेशाची आराधना केली. सर्व देव गणेशास शरण आले.

तेव्हा गणेशाने सर्व देवांना अभय देऊन विघ्नासूराचा नाश करण्याचे वचन दिले.

गणेशाने काळराक्षस मायावी विघ्नासूराशी युद्ध करून त्यास जेरीस आणले. गणेशपुढे आपले काही चालत नाही हे पाहून विघ्नासूर गणेशास शरण गेला व त्याने अभय मागितले. तेव्हा गणेशाने त्याला जीवदान देऊन सांगितले, ‘जेथे जेथे माझे भक्त पूजाअर्चा, प्रार्थना करीत असतील, तेथे तू म्हणजे काळाने कसलेही विघ्न देऊ नये. शिवाय कार्यारंभी जो माझे स्मरण करणार नाही त्याच्या कार्यातच विघ्ने आणीत जा.’

विघ्नासूराने हे मान्य केले व गणेशाकडे वर मागितला, ‘आपली आज्ञा मी सदेव पाळीन. आपल्या चरणी माझी भक्ती अखंड राहावी. आपण माझे नाव धारन करावे’
गणपतीला विघ्नासूर जेथे शरण आला त्या ठिकाणी देवांनी गजाननाच्या मूर्तीची स्थापना केली आणि गजाननाने ‘विघ्नराज-विघ्नहर्ता’ हे नाव धारण केले. पुणे जिल्ह्यात ओझर येथे विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे हे स्थान अष्टविनायकांमध्ये प्रसिद्ध स्थान आहे.