केसरीवाड्यात गुंजला लोकमान्य टिळकांचा भारदस्त आवाज

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

‘आजचा कार्यक्रम गणपती उत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणे गायनाचार्य बखलेबुवांचे गाणे सुरु झालेच आहे. माझी इच्छा आहे की लोकांनी ते शांतपणे ऐकावे. कुणी गडबड केल्यास मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावे. बखलेबुवांच्या गाण्याविषयी माझे जे विचार आहेत त्याबद्दल मला अभिमान वाटतो. संगीत ही एक मोठी कला आहे. मी जरी ही कला शिकलो नसलो तरी, त्यांच्या गाण्याविषयीचे वाटणे खोटे नाही…’, हा भारदस्त आवाज होता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा. शेकडोंनी जमलेले पुणेकर हा आवाज ऐकताना अक्षरशः थरारुन गेले होते. त्यातल्या काही जणांचे मन भरुन आले होते.

केसरीवाडा येथे शुक्रवारी टिळक पंचांगानुसार सुरु असलेल्या केसरी गणेशोत्सवात १९१५ सालचा दुर्मिळ असा टिळकांच्या भाषणाचा आवाज ऐकण्याची सुवर्ण संधी पुणेकरांना मिळाली होती.

ही दुर्मिळ ध्वनिफित मुकेश नारंग यांच्या संग्रहात होती व ती ऐकवण्यापूर्वी केसरीचे संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित भास्करबुवा बखले यांच्या नातसून शैला दातार, रोहित टिळक, माधव गोरे, मंदार वैद्य, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि निवेदक सुधीर गाडगीळ या वेळी उपस्थित होते.

टिळकांचा हा दुर्मिळ ठेवा आपल्या संग्रहात साठवण्यासाठी अनेकांनी मोबाईल व कॅमेराचा वापर केला. उपस्थितांनी ‘वन्स मोअर’चा नारा केला आणि ध्वनिफित तीन वेळा ऐकवण्यात आली. ज्यांच्याकडे रेकॉर्ड करण्यासाठी कोणतेच साधन नव्हते त्यांनी पुन्हा पुन्हा ऐकून ती ध्वनिफित आपल्या कानात साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला. बखलेबुवांचे गाणे संपल्यानंतर टिळकांनी स्वतःच्या खांद्यावरचे उपरणे त्यांना भेट म्हणून दिले होते. ते उपरणे दातार यांनी सर्व उपस्थितांना दाखवले.

त्यानंतर वागळे यांच्या मुलाखतीला सुरुवात झाली. ‘माणूस’चे संपादक श्री. ज. माजगावकर, ‘सोबत’कार ग. वा. बेहेरे यांच्यासारख्या माणूस आणि संपादक असलेल्या मोठया मंडळींचा असलेला प्रभाव, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतील सहभाग, मतं न पटणारा पत्रकार किंवा संपादकाचंदेखील लिखाण देखील वाचण्याची आस्था आदी विषयांवर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली.