कोकणात पर्यटन महामंडळातर्फे व्होल्वो बस

कोकणात व्होल्वो बस

कोकणात व्होल्वो बस

पुणे : कोकणातील पर्यटनस्थळांचा आनंद घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे खास व्होल्वो बसेस सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती पर्यटन तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी प्रस्तावित असलेल्या सी वर्ल्ड प्रोजेक्टबाबतचे आणि राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत सुरू करावयाच्या व्होल्वो बसचे सादरीकरण आज श्री. भुजबळ यांना करण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या परिसरातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमध्ये इंग्लंडमधील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांना सादरीकरण केले. त्यामध्ये या प्रकल्पाची रचना, पर्यटकांना उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा यांची माहिती देण्यात आली.

श्री. भुजबळ म्हणाले, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत खास व्होल्वो बस सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या बसेस पुणे मार्गे आणि मुंबईमार्गे कोकणात जातील. चार किंवा पाच दिवसांचे पॅकेज टूरमध्ये रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, मुरूड-जंजिरा, दिवे आगर, रायगड रोपवे, रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम मंदिर, वालवलकर संग्रहालय, भाट्ये बीच आणि गणपतीपुळे मंदिर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर, सावंतवाडी आदी ठिकाणांना ही बस भेट देईल, असे प्रस्तावित आहे. या बसमध्ये वाय-फाय कनेक्टिव्हिटी, जीपीएस ट्रकिंग सिस्टिम, एलसीडी टीव्ही. प्रसाधनगृह आदी सोयी असणार आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता ए.पां. उगिले आणि पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण होणार.

पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते येत्या २८ नोव्हेंबर २०१२ रोजी केले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.

पुणे विद्यापीठाच्या आवारात महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. त्याबाबत आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचा आढाव घेण्यासाठी आणि पुतळा परिसराच्या जागेची पाहणी करण्यासाठी श्री. भुजबळ यांनी आज पुणे विद्यापीठास भेट दिली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली. राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल. या कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. भुजबळ यांनी कार्यक्रमाच्या तयारीची आणि नियोजनाची माहिती घेतली. त्यांना कुलगुरू वासुदेव गाडे, तसेच महात्मा फुले पुतळा समितीचे सदस्य प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ, डॉ. संजीव सोनवणे आणि प्रा. अविनाश खरात यांनी माहिती दिली. बैठकीनंतर श्री. भुजबळ यांनी पुतळा जेथे उभारला जाणार आहे त्या जागेची आणि कार्यक्रमाच्या ठिकाणची पाहणी केली. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत त्यांनी विद्यापीठाचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता ए.पां. उगिले, कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.