सात जुलैनंतर पाण्याची बोंब

सात जुलैनंतर पाण्याची बोंब

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, ‘खूप दिवसांपासून पावसाने सुट्टी घेतली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी खूप कमी झाले आहे व त्याची पातळी तळाला गेली. सध्या केवळ १.२० टीमसी पाणीच आहे. हीच स्थिती जर कायम राहिली तर ७ जुलैनंतर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल.’

खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे शहराला पाणी पुरवठा करतात व त्या धरणांमध्ये केवळ चार टक्केच पाणी शिल्लक आहे व तेवढेच पाणी पुढील काही दिवस वापरायचे आहे. या चार धरणांत गेल्या वर्षी २६ जूनला पंधरा टक्के पाणी शिल्लक होते. शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी एप्रिल महिन्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बैठक झाली. त्या बैठकीत महापालिकेला महिन्याला एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनी असेही सांगितले की, पाटबंधारे खात्याने त्यानुसार आपली जबाबदारी पार पाडली आहे.