येणार साजण माझा

शालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला
सजिणी बाई, येणार साजण माझा !
गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माला
साजणी बाई, येणार साजण माझा ! ॥धृ॥

चूलबोळकीं इवलीं इवलीं, भातुकलीचा खेळ ग
लुटूपूटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशिमधागे ओढिति मागें, व्याकुळ जिव हा झाला ॥१॥

सूर गुंफिले सनई येथें, झडे चौघडा दारीं
वाजत गाजत घोड्यावरती येइल आतां स्वारी
मी वरमाला घालिन त्याला मुहूर्त जवळीं आला ॥२॥

मंगल वेळीं मंगल काळीं डोळां कां ग पाणी ?
साजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारील बांधिन त्याचा शेला ॥३॥